www.abhinavgita.com

My translation of Bhagvadgeeta in Poetry

मी आणि भगवद्गीता..

मी मुकुंद भालेराव. तसा मी एक व्यावसायीक चित्रकार आहे. सध्या पुण्यात असतो. तसा अध्यात्म हा माझा पिंड नाही. ना मी कुणी विरक्त, संसारापासून अलिप्त असा तुसडा वैरागी आहे. मी एक सरळ साधा शेतक-याचा मुलगा आहे. हो, मी भणंग मात्र आहे. हा भणंगपणा कदाचित प्रत्येक कलाकारात कुठेतरी लपलेला असतोच म्हणा. पुण्यात अभिनव कलामहाविद्यालयात शिकत असताना हा भणंगपणा जरा जास्तच व्यक्त झाला. म्हणजे कट्ट्यावर टवाळक्या करणं, नियमीतपणे तास बुडवणं हा परिपाठ असायचा. पण तिस-या वर्षात असताना अचानक एक नवीन छंद जडला. टवाळखोर वा प्रेमकविता लिहीणारा मी.. भगवद्गीता चाळायला लागलो. तशी ती अगदीच अनोळखी होती असं नाही. शाळेत असताना अवांतर पाठांतराच्या एका नावडत्या तासाला ती नेहमी भेटायची. तेव्हा वाटायचं की हे कधीही न समजणारं पाठांतर कधी पिच्छा सोडील देव जाणे. आणि केवळ पाठच करा, समजून घेऊच नका असंच काहीसं त्यावेळी गणित होतं. असो..
    आता गीता समजू लागली होती कारण माध्यमिक वर्गांत संस्कृतचे पायाभूत धडे गिरवले होते. माझ्या आईला अध्यात्मिक अंग आहे. सुटीत गावी असताना एक दिवस सहजच तिच्या जुन्या पेटीमधून गीता घेतली. पहिला श्लोक वाचला आणि तिचा प्रतिध्वनी मनात एका सोप्या ओवीच्या रूपानं उमटला. हे प्रतिध्वनी कधी थांबूच नये असं वाटलं. आणि मग वेगळ्या अनुभवाची सुरुवात झाली. म्हणजे अनुभूती, साक्षात्कार असं काहीसं बोलून तुम्हाला एकदम घाबरवून टाकायचा माझा विचार नाही. मी आधीच सांगितलंय की मी एक सरळ साधा शेतक-याचा मुलगा आहे. मी कट्ट्यावर टवाळक्या करणं, नियमीतपणे तास बुडवणं हे सोडून नव्या उद्योगाला लागलो. वर्गात, रूमवर आणि जमेल तिथे गीता वाचणं आणि वाचलेला श्लोक ओवीबद्ध करणं हा नवीन परिपाठ सुरु झाला. अर्थात बाकीचे नियमीत दिनक्रम चालू होतेच पण ह्या नवीन कामाने दिवसाचा एक मोठा भाग व्यापला होता. त्या दिवसांत भगवद्गीता, वही आणि एक पेन एवढंच सोबत असायचं. काहीजणांनी मला वेड्यांत जमा केलं होतं. त्यांच्या दृष्टीनं माझ्या सारखा टपोरी कार्टा आणि भगवद्गीता हे न जमणारं समिकरण होतं.
    पण प्रामाणिकपणे सांगतो की मी हे का करतोय हा प्रश्न तेव्हा मला खरंच पडला नाही. आपण एक चांगली गोष्ट करत आहोत हे मात्र पक्क माहीती होतं. आणि आपण ज्ञानेश्वरमाऊलींसारखे महाविष्णूचे अवतार किंवा विनोबां सारखे गीतापरायण तत्वज्ञानी तर मुळीच नाही ही जाणीव तेव्हाही होती आणि आजही आहे. त्यामुळे एक सामान्य विद्यार्थी म्हणूनच या लिखाणाची जबाबदारी घ्यायला मला आवडेल. हे लिखाण माझ्या वहीत आणि माझ्या आप्तांपुरतेच सीमीत राहू नये तर ते जगभरातील सर्व मराठी बांधवांपर्यंत पोहचावे एवढाच प्रामाणिक हेतु आहे.

Create a free website at Webs.com